
तुकोबांच्या साहित्यावर भव्य चर्चासत्र
पुणे, ता. १८ - मराठी मनाला वास्तववादी पातळीवरून तत्त्वज्ञान सांगणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या जन्मचतुःशताब्दीनिमित्त "साहित्य अकादमी' या साहित्यविषयक शिखर संस्थेतर्फे भव्य स्वरूपात तुकोबांच्या साहित्यावर आधारित राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी शनिवारी "सकाळ'ला ही माहिती दिली. मराठी मनात तुकोबांच्या अभंगांचे स्थान अनन्यसाधारण आहे. अनेक वर्षांपासून तुकोबांच्या "गाथे'वर अनेक लेखक, तत्त्वचिंतक, विचारवंत, समीक्षकांनी आपापल्या आकलनानुसार काम केले आहे. त्यांच्या रचनांची आणि त्यातून अभिप्रेत आशयाची अनेक प्रकारे मांडणी झालेली आहे. तुकोबांचे तत्त्वज्ञान अन्य भारतीय भाषांप्रमाणेच विदेशी भाषांतही अनुवादित झाले आहे. या पार्श्वभूमीवर "साहित्य अकादमी'सारख्या सर्वोच्च संस्थेने तुकोबांवर विशेष चर्चासत्राचे आयोजन करावे, हे महत्त्वाचे आहे. गंगोपाध्याय म्हणाले, ""तुकोबांचे विचार आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते आणि मराठी भाषेपुरते मर्यादित नाहीत. ते विश्वात्मक आहे. आजवर तुकोबांवर मराठी भाषेत विपुल लेखन आणि समीक्षात्मक-स्पष्टीकरणात्मक लेखन झाले आहे. विदेशांतही तुकोबांच्या विचारांचा अभ्यास केला जातो. साधी, सोपी भाषा, दैनंदिन जीवनातील उदाहरणे, सर्वसामान्यांच्या अनुभवाचे विश्व तुकोबांनी सहजतेने अध्यात्माकडे वळविले आहे. त्यांचे अभंग भांडार अद्वितीय स्वरूपाचे आहे. हे लक्षात घेऊन अकादमीने या महान साहित्यिकाची आठवण आणि त्यांच्या लेखनाचे समकालीनत्व राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याचा निर्णय घेतला आहे.'' या चर्चासत्रासाठी अकादमीतर्फे देशभरातील तुकोबांचे अभ्यासक, लेखक, संशोधक यांना आमंत्रित केले जाईल. चर्चासत्र तीन दिवसांचे असेल. परदेशस्थ अभ्यासकांनाही यासाठी निमंत्रित केले जाईल. अकादमीच्या माध्यमातूनही त्यामुळे तुकोबांचे विचार देशाच्या सर्व भागांत त्या त्या भाषांत पोचण्यास मदत होईल. तुकोबांच्या "गाथे'ची अन्य भाषांत अधिकाधिक संख्येने भाषांतरे करण्याचाही विचार आहे. चर्चासत्राची नेमकी वेळ अजून ठरली नसली, तरी येत्या चार महिन्यांत ते घेतले जाईल, असेही गंगोपाध्याय म्हणाले.
No comments:
Post a Comment